35
शब्बाथ दिवसाविषयीचे नियम
मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या; सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्या दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही मनुष्यास अवश्य जिवे मारावे. शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या राहत असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.
परमेश्वराप्रीत्यर्थ आणावयाचे अर्पण
निर्ग. 25:1-9; 39:32-43
मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे; परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ; निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस; लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची *कातडी, बाभळीचे लाकूड; दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले; तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.
निवासमंडपातील वस्तू
10 “तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे 11 निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या; 12 कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट, 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर; 14 प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल; 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा; 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक; 17 अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा; 18 निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी मेखा व तणावे, 19 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”
निवासमंडपासाठीची अर्पणे
20 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. 21 नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली. 22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळ्या स्त्रीपुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली. 23 ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले. 24 चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले. 25 ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले. 26 आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. 27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. 28 दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. 29 परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.
बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक
निर्ग. 31:1-11
30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे. 31 आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. 32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील. 33 तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. 34 परमेश्वराने त्यास आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्यांच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. 35 कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.
* 35:7 एक समुद्री प्राणी