43
योसेफाचे भाऊ बन्यामिनासह पुन्हा मिसर देशास येतात
1 कनान देशात दुष्काळ फारच तीव्र पडला होता.
2 असे झाले की, त्यांनी मिसर देशाहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”
3 परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’
4 तेव्हा तुम्ही भावाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही खाली जाऊन धान्य विकत आणू.
5 पण तुम्ही त्यास पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”
6 इस्राएल म्हणाला, “पण तुम्हास आणखी एक भाऊ आहे असे त्या मनुष्यास सांगून तुम्ही माझे असे वाईट का केले?”
7 ते म्हणाले, “त्या मनुष्याने आमच्याविषयी व आपल्या परिवाराविषयी बारकाईने विचारपूस केली. त्याने आम्हांला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा आणखी दुसरा भाऊ आहे का?’ आम्ही तर त्याच्या या प्रश्नाप्रमाणे त्यास उत्तरे दिली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे सांगेल, हे आम्हांला कुठे माहीत होते?”
8 मग यहूदा आपला बाप इस्राएल याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणजे आम्ही जाऊ. मग आपण म्हणजे आम्ही, तुम्ही व आपली मुलेबाळे जिवंत राहू, मरणार नाही.
9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन.
10 जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.”
12 या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल.
13 तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा.
14 “त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”
15 अशा रीतीने त्या मनुष्यांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले.
16 त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यास योसेफाने सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या गोणीत आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.”
19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले आणि घराच्या दरवाजाजवळ ते त्याच्याशी बोलू लागले.
20 ते म्हणाले, “धनी, मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.
21 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक मनुष्याचा पैसा ज्याच्या गोणीत पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हास परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत.
22 आणि आता या वेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत, आमच्या गोणीत पैसे कोणी ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
23 परंतु कारभाऱ्याने उत्तर दिले, “तुम्हास शांती असो, भिऊ नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत ते पैसे ठेवले असतील. मला तुमचे पैसे मिळाले आहेत.” नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.
24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.
25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहोत हे त्या भावांनी ऐकले होते. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत तयारी करून त्यास देण्याच्या भेटी तयार केल्या.
26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.
27 मग योसेफाने ते सर्व बरे आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचा बाप, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले होते, तो बरा आहे का? तो अजून जिवंत आहेत का?”
28 त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले.
29 मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.”
30 मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्यास वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला.
31 मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.”
32 योसेफाला त्यांनी वेगळे व त्याच्या भावांना वेगळे वाढले. मिसरी लोक त्याच्यासोबत तेथे वेगळे असे जेवले, कारण इब्री लोकांबरोबर मिसरी लोक जेवण जेवत नसत, कारण मिसऱ्यांना ते तिरस्कारणीय वाटत असे.
33 त्याच्या भावांना त्याच्यासमोर बसवले, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार थोरल्या भावाला प्रथम बसवले, आणि इतरांस त्यांच्या वयांप्रमाणे बसवल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
34 योसेफाने त्याच्या पुढील पक्वान्नामधून वाटे काढून त्यांना दिले, पण त्याने बन्यामिनाला इतरांपेक्षा पाचपट अधिक वाढले. ते सर्व भरपूर जेवले व मनमुराद पिऊन आनंदीत झाले.