2
आपल्या सुवार्ताप्रसारक कामाचे पौल समर्थन करतो
1 बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.
2 परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
3 कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
4 तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही मनुष्यांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल तसे बोलतो.
5 कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे;
6 आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो;
7 तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
8 आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.
9 बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
10 तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत आम्ही पवित्रतेने, नीतिने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे
11 तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्यास शोभेल असे तुम्ही चालावे.
छळ
13 या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
14 बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;
15 त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;
16 परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत रहावे; त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे.
पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष
17 बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;
18 ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडविले.
19 कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?
20 कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात.