33
परमेश्वर उद्धार करील
अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही!
अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो!
जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील,
जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील.
हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो;
रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो.
मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली.
टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील.
परमेश्वर उंचावला आहे. तो उच्चस्थानी राहतो. त्याने सियोनेस प्रामाणिकपणा व चांगुलपणा यांनी भरले आहे.
तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.
पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत.
राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही.
त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा *अनादर केला.
भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे;
शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत.
10 परमेश्वर म्हणतो आता मी उठेन, आता मी उठून उभा राहिल, आता मी उंचावला जाईन.
11 तुम्ही भुसकटाची गर्भधारणा कराल व धसकट प्रसवाल, तुमचा श्वास अग्नी आहे तो तुम्हास खाऊन टाकील.
12 लोक भाजलेल्या चुन्याप्रमाणे भस्म होतील, जसे काटेरी झुडपे तोडून व अग्नीत टाकतात.
13 जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या.
14 सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे.
आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील?
15 तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो;
जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही
व दुष्कृत्याकडे पाहत नाही.
16 तो आपले घर उच्च स्थळी करील;
त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील.
17 तुझे नेत्र राजाला त्याच्या शोभेत पाहतील; ते विस्तीर्ण भूमी पाहतील.
18 भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे?
19 उद्धट मनोवृतीचे लोक, अनोळखी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे तुला पुर्णपणे आकलन झाले नाही अशा लोकांस तू फार काळ पाहणार नाहीस.
20 सियोनेकडे पाहा, हे नगर आपल्या मेजवाणीचे आहे;
तुझे डोळे यरूशलेमेकडे शांतीचे वस्तीस्थान म्हणून पाहतील. त्याचा तंबू कधीही काढणार नाहीत,
त्याच्या खुंट्या कधीही उपटणार नाहीत, ज्याच्या दोरखंडातील एकही दोरी तुटणार नाही.
21 त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी व प्रवाहांची अशी होईल.
त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत.
22 कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आम्हास न्याय देणारा आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तोच आम्हास तारील.
23 तुझे दोर ढिले झाले आहेत; त्यांना आपल्या डोलकाठीस घट्ट धरून ठेवत आधार नाहीत; ते शीड पसरीत नाहीत;
जेव्हा मोठ्या लुटीची लूट वाटण्यात आली, जे पांगळे त्यांनी लूट वाटून घेतली.
24 मी रोगी आहे, असे म्हणणारा त्यामध्ये वस्ती करणार नाही. जे लोक त्यामध्ये राहतात त्यांच्या अन्यायांची क्षमा करण्यात येईल.
* 33:8 साक्षींचा