योहानाचे पहिले पत्र
लेखक
हे पत्र लेखक ओळखत नाही, परंतु मंडळीची मजबूत, सातत्त्यपूर्ण आणि सुरुवातीची साक्ष शिष्य आणि प्रेषित योहानाला संबोधित करते (लूक 6:13, 14). जरी या पत्रामध्ये योहानाचे नाव कधीही नमूद केलेले नसले तरी, तीन सुस्पष्ट सूचना त्याच्याकडे आहेत ज्यांनी त्याला लेखक म्हणून निर्देशित केले आहे. पहिले, दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीच्या लेखकांनी त्याला लेखक म्हणून संदर्भित केले. दुसरे, पत्रांमध्ये योहानाच्या शुभवर्तमानामध्ये समान शब्दसंग्रह आणि लेखन शैली समाविष्ट आहे. तिसरे, लेखकाने लिहिले की त्याने येशूच्या शरीराला पाहिले आणि स्पर्श केले होते, जो प्रेषिताच्या बाबतीत नक्कीच सत्य होते (1 योहान 1:1-4; 4:14).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 85 - 95.
योहानाने इफिस येथे आपल्या जीवनाच्या नंतरच्या भागात पत्र लिहिले, जिथे त्याने आपले बहुतेक वृद्ध आयुष्य घालवले.
प्राप्तकर्ता
योहानाच्या पहिल्या पत्राचे प्रेक्षक पत्रामध्ये स्पष्टपणे सूचित नाहीत. तथापि, सामग्रीवरून असे सूचित होते की योहानाने विश्वासूंना लिहिले (1 योहान 1:3, 4; 2:12-14). हे शक्य आहे की याला अनेक ठिकाणी संतांना उद्देशून लिहिण्यात आले आहे. सामान्यत: सर्वत्र ख्रिस्ती लोकांना, 2:1, “अहो माझ्या मुलांनो.”
हेतू
योहानाने सहभागीतेची उन्नती करण्यासाठी, जेणेकरून पापापासून आपल्याला वाचता येण्याकरिता, तारणप्राप्तीचे पूर्ण आश्वासन देण्यासाठी, विश्वासात ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक सहभागिता आणण्यासाठी आणि आपण आनंदाने भरले जावे यासाठी हे पत्र लिहिले. योहान विशेषतः मंडळीपासून विभक्त झालेल्या खोट्या शिक्षकांचा प्रश्न सोडवतो आणि जे लोक सुवार्तेच्या सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते.
विषय
परमेश्वराशी सहभागीता
रूपरेषा
1. येशूची मानवी देह धारण करण्याची वास्तविकता — 1:1-4
2. सहभागीता — 1:5-2:17
3. फसवणूक ओळखणे — 2:18-27
4. सद्यस्थितीत पवित्र राहण्याची प्रेरणा — 2:28-3:10
5. आश्वासनासाठी आधार म्हणून प्रेम — 3:11-24
6. खोट्या आत्म्याची पारख — 4:1-6
7. पवित्रतेची आवश्यक — 4:7-5:21
1
जीवनाचा शब्द ख्रिस्त हा आहे
योहा. 1:1-5
1 जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
2 ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले.
3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
4 तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो.
देवसहवास म्हणजे पापाचा त्याग
5 जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.
6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.
7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.
9 जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.