32
यिर्मया अनाथोथ येथे शेत विकत घेतो
1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे नबुखद्नेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले.
2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.
3 यहूदाचा राजा सिद्कीया याने त्यास कैद केले होते आणि म्हणाला, तू का भविष्य करतो व म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, पाहा, हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो ते घेईल.
4 आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातातून सुटणार नाही, कारण तो खरोखर बाबेलाच्या राजाच्या हाती दिला जाईल. व त्याच्याशी समोरासमोर बोलेल आणि तो आपल्या डोळ्यांनी राजाला पाहील.
5 कारण सिद्कीया बाबेलाला जाईल आणि मी परमेश्वर असे म्हणतो की मी त्याची भेट घेईपर्यंत तो तेथे राहील. जरी तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुम्ही यशस्वी होणार नाही.
6 यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले व म्हणाले,
7 पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.
8 मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.
9 म्हणून मी माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्याकडून अनाथोथातले ते शेत विकत घेतले आणि मी त्यास सतरा शेकेल रुपे मोजून दिले.
10 नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले.
11 पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,
12 माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्यासमक्ष आणि ज्या साक्षीदारांनी खरेदीखतावर सही केली होती त्यांच्यासमक्ष आणि जे सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले होते त्यांच्यासमक्ष, मी ते खरेदीखत महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा बारूख याच्या हाती दिले.
13 म्हणून त्यांच्यासमोर मी बारूखाला आज्ञा केली. मी म्हणालो,
14 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, हे मोहोरबंद केलेले खरेदीखत व मोहोरबंद नसलेले खरेदीखत यांच्या पावत्या घे. त्या दीर्घकाळ राहाव्या म्हणून नवीन पात्रात घालून ठेव.
15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील.
16 नेरीयाचा मुलगा बारूख ह्याला खरेदीखताची पावती दिल्यावर, मी परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणालो,
17 अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
18 परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.
19 तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.
20 तू मिसर देशात चिन्ह व चमत्कार केलेस. आजपर्यंत येथे इस्राएलात आणि सर्व मानवजातीत तू आपल्या नावाची किर्ती केली आहे.
21 कारण तू आपले लोक इस्राएलांना चिन्ह आणि चमत्कारांनी, आपला सामर्थ्यवान हाताने, बाहू उभारून आणि मोठ्या दहशतीने मिसरामधून बाहेर आणलेस.
22 नंतर तू त्यांच्या पूर्वजांना दूध व मध वाहण्याचा हा जो देश देण्याची शपथ वाहिली. तो हाच देश तू त्यांना दिला.
23 आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही किंवा तुझ्या नियमाचे आज्ञापालन केले नाही. त्यांना तू जे करण्याची आज्ञा दिली होती त्यांनी काहीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर ही सर्व संकटे आणली.
24 पाहा! हे नगर काबीज करण्यासाठी वेढे घातले आहेत. कारण तलवार, दुष्काळ आणि मरी, यामुळे हे नगर जे खास्दी त्याविरूद्ध लढाई करतात त्यांच्या हाती देण्यात आले आहे. कारण तू जे काही बोललास ते घडले आहे. आणि पाहा, ते तू पाहिले आहे.
25 तरी तू मला म्हणालास, तू आपल्यासाठी रुप्याने शेत खरेदी कर आणि साक्षीसाठी साक्षीदार बोलाव, जरी मी हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जात आहे.”
26 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
27 “पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?”
28 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील.
29 आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.
30 कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी निश्चित आपल्या तरुणपणापासून माझ्या दृष्टीने जे वाईट तेच करीत आली आहेत. इस्राएलाच्या लोकांनी आपल्या हातानी प्रत्यक्ष कृती करून त्यांनी खचित माझा अपमान केला आहे.” असे परमेश्वर म्हणत आहे.
31 ज्या दिवशी त्यांनी हे नगर बांधले त्यादिवसापासून आतापर्यंत ते माझा क्रोध आणि कोप चेतविण्याचे कारण होत आले आहेत. म्हणून ते मी आपल्यापुढून दूर करीन.
32 कारण इस्राएल व यहूदातील सर्व लोकांनी, त्यांचे राजे, सरदार, याजक, संदेष्टे आणि यहूदातील प्रत्येक व्यक्तीने व यरूशलेमेत राहणाऱ्यांनी मला कोपविण्यासाठी ज्या दुष्टपणाच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांमुळे मी असे करीन.
33 “त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.
34 नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या.
35 आणि त्यांनी बआल देवाची जी उंचस्थाने हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात आहेत ती त्यांनी आपली मुले व मुली यांचा मोलख देवाला होमार्पण करण्यासाठी बांधली. हे काही करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. आणि यहूदाने पाप करावे म्हणून त्यांनी किळसवाणी गोष्टी कराव्या, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
36 म्हणून आता, ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता, हे तलवार, दुष्काळ व मरीने बाबेलाच्या राजाच्या हाती देण्यात येईल त्या नगराविषयी मी, परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो,
37 पाहा, ज्या प्रत्येक देशात मी आपल्या क्रोधाने, कोपाने आणि महारोषाने त्यांना घालवून दिले आहे, तेथून मी त्यांना गोळा करून परत येथे आणीन आणि त्यांना सुरक्षित राहण्याची शक्ती देईन.
38 ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.
39 त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
40 आणि मी त्याजशी सर्वकाळचा करार करीन. तो असा की, मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपला आदर त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.
41 नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत:करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन.
42 परमेश्वर असे म्हणतो, जसे मी हे सर्व मोठे अरिष्ट या लोकांवर आणले आहे, तसे ज्या चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोललो आहे, त्या मी सर्व त्यांच्यासाठी करीन.
43 ज्या देशाविषयी तुम्ही म्हणता, ‘हे ओसाड आहे, तेथे कोणी मनुष्य व पशू नाहीत. तो खास्द्यांच्या हाती दिला आहे, मग त्या या देशात शेते खरेदी करतील.
44 बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतीच्या प्रदेशातील व यहूदातील नगरांत व डोगराळ प्रदेशाच्या नगरात व तळवटीच्या नगरात व नेगेबच्या नगरात लोक रुप्याने शेते खरेदी करतील आणि खरेदीखतावर सह्या घेऊन मोहोरबंद करतील व साक्षीदार बोलावून आणतील. कारण त्यांचे बंदिवासात गेलेले परत येतील. असे परमेश्वर म्हणत आहे.