94
दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
1 हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे,
तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर.
2 पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ,
गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
3 हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ,
दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
4 ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात
आणि फुशारकी मारतात.
5 हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात;
जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
6 ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात,
आणि ते अनाथांचा खून करतात.
7 ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही,
याकोबाचा देव लक्ष देत नाही.
8 अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या;
मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
9 ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय?
ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
10 जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो.
तो अज्ञानी असणार का?
11 परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो,
ते भ्रष्ट आहेत.
12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस,
ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत,
तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
15 कारण न्याय नितीमानाकडे वळेल;
आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
16 माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल?
अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
17 जर परमेश्वराने मला मदत केली नसती,
तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
18 जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे,
तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
19 जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
20 जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट
योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
21 ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात,
आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
22 परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे,
आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
23 त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे;
आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील.
आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.